गुरुनानक जयंतीनिमित्त भुसावळात भव्य शोभायात्रा ; शहरात भक्तीचा जल्लोष !

शीख व सिंधी समाजाचा मोठा सहभाग; तलवारबाजी, शौर्यकसरती आणि ढोल-ताशांच्या गजराने वेधले लक्ष
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी भुसावळ शहरात धार्मिक उत्साह आणि सामाजिक एकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. जळगाव रोडवरील गुरुद्वारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शीख बांधवांसह सिंधी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला
गुरु ग्रंथ साहिब यांच्या पवित्र सान्निध्यात शोभायात्रेला प्रारंभ झाला. पारंपरिक पंजाबी ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रथ, फुलांची सजावट आणि ध्वजपताकांनी शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले. आंबेडकर चौक, बाजारपेठ, पोलीस स्टेशन, पांडुरंग टॉकीज, आठवडे बाजार, सराफ बाजार आणि बसस्थानक रोड या प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा मार्गस्थ झाली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले

‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल!’ या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. शोभायात्रेत पंच प्यारे, तलवारबाजीची प्रात्यक्षिके, गोळाफेक आणि विविध शौर्यकसरती सादर करण्यात आल्या. शीख तरुणांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला, तर तरुणांनी शोभायात्रेच्या मार्गावर स्वच्छता राखून सामाजिक जबाबदारीचे भान जपले.
गुरुनानक देवजी यांनी दिलेला मानवता, समानता, सेवा आणि बंधुभावाचा संदेश या शोभायात्रेतून अधोरेखित झाला. शीख आणि सिंधी समाजाच्या एकत्रित सहभागाने भुसावळच्या सामाजिक सलोख्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
धार्मिक श्रद्धा, शौर्य, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही शोभायात्रा भुसावळकरांसाठी गुरुनानक जयंतीचे विशेष आकर्षण ठरली.

