यावल नगरपरिषदेत सत्यम,शिवम सुंदरम कारभार..? भ्रष्टाचारामुळे नागरिक अनेक सुविधांपासून वंचित.
भ्रष्ट कारभाराची चौकशी करा. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील.
यावल दि.२९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्याकडे पाणीपुरवठ्यासह अग्निशमन, बांधकाम विभागासह नगरपरिषदेतील इतर अनेक महत्त्वाच्या कामांची अधिकृतरित्या जबाबदारी मोठ्या विश्वासाने मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी टाकली आहे.हे दोघेही अधिकारी मुख्यालयात कमी आणि शासकीय कामाच्या नावाखाली तसेच त्यांच्या निवासस्थानी जास्त वेळ रहात असल्याने यावल शहरातील नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित असून नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत.यामुळे यावल नगरपरिषदेच्या भोंगळ व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव, मुख्याधिकारी नगरपरिषद यावल यांच्याकडे केली आहे.
दि.२९ मे २०२५ दिलेल्या लेखी तक्रारीत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी नमूद केले आहे की यावल नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्याकडे आस्थापनेनुसार पाणीपुरवठा व स्वच्छता निरीक्षक अशी जबाबदारी आहे परंतु यावल नगरपरिषद मध्ये बांधकाम अभियंता हे पद सुमारे २ वर्षापासून रिक्त आहे त्यांच्याकडे बांधकाम अभियंता ही अतिरिक्त जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे, बांधकाम विभागाचा पदभार सत्यम पाटील यांनी घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात काढण्यात आलेल्या निविदांमध्ये मनमानी पद्धतीने अटी व शर्ती टाकून निविदा प्रसिद्ध केल्या जातात शहरांमधील एकूण ११ मी बगीच्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या निविदा १४ महिन्याच्या कालखंडात तब्बल ६ वेळेस काढल्या, सदर निविदा कधी ऑफलाइन तर कधी ई निविदा काढल्या निविदेमध्ये मर्जीतल्या ठेकेदारांन व्यतिरिक्त अन्य ठेकेदारांच्या निविदा आल्याने त्या पुन्हा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत.
हिंदू स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता गटारी सह बांधकाम करणे व पुलाचे बांधकाम करणे या कामाची निविदा दि.२० मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, या निवेदन मध्ये टेंडर मॅनेज करण्याच्या दृष्टीने अटी व शर्ती टाकण्यात आल्या होत्या परंतु मर्जीतल्या ठेकेदारा व्यतिरिक्त अन्य ठेकेदाराने नगरपरिषद यावल यांना लेखी पत्र दिल्याने निविदा मनमानी पद्धतीने रद्द करण्यात आली आहे.
यावल नगरपालिकेचे मालकीचे जेसीबी मशीन नगरपालिकेचे डिझेल वापरून नगरपालिका हद्दी बाहेर खाजगी लोकांच्या शेती कामासाठी सर्रासपणे वापरले जात आहे. यात मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा यावल शहरात आहे.
यावल नगर परिषदेत दोन महिन्यापासून शासनाने बांधकाम अभियंता म्हणून श्री संग्राम शेळके यांना पदस्थापना दिलेली आहे तरी देखील यावलचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी खास आपल्या मर्जीतले पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार न काढता शासनाने दिलेल्या बांधकाम अभियंता शेळके यांना पदभार दिला नाही. शेळके यांना पदभार न दिल्याने सत्यम पाटील आणि मुख्याधिकारी यांचे यावल नगरपालिकेत संगम मताने सर्व व्यवहार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पाणीपुरवठा विभागात प्रचंड अनागोंदी सुरू असून शहरात पुरेसा मुबलक पाणीपुरवठा होत नसून अनियमित अल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने यावलकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावल शहरात ठराविक ठिकाणचे साफसफाई चे फोटो सेशन प्रसिद्धी केली जात असली तरी शहरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे गटारी तुडुंब भरलेल्या आहेत गटारी नियमित काढल्या जात नाहीत व काढल्या तर कचरा तात्काळ उचलला जात नाही शहरांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने डेंगू व तापाचे रुग्ण आढळून येत असून साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता निरीक्षक या पदाची जबाबदारी असलेले सत्यम पाटील हे आठवड्यातून फक्त एक दिवस ते सुद्धा अवेळी मुख्यालयात हजर राहून काही ठराविक कामे करून अमळनेर येथील स्वतःच्या निवासस्थानी निघून जातात.याच प्रकारे यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुद्धा भुसावळ येथून ये — जा करीत असल्याने सत्यम पाटील आणि मुख्याधिकारी घर भाडे घेतात किंवा नाही..? आणि घेत असतील तर यावल शहरात निवासस्थानाचा नेमका पत्ता त्यांनी कुठला दिला आहे..? आणि ते त्या ठिकाणी कोणत्या वेळेला हजर असतात याबाबत स्वतः अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अशाप्रकारे यावल नगर परिषदेत सत्यम पाटील यांचा कारभार म्हणजे यावल नगरपालिकेत सत्यम शिवम सुंदरम या ब्रीदवाक्याचे कार्यालयात दर्शनी भागाच्या ठिकाणी लावायला पाहिजे अशी सुद्धा आता यावलकरांमध्ये चर्चा आहे.