भुसावळमध्ये तरुणीवर तिघांकडून छेडछाड, मारहाण व लुटमार
चाकू दाखवून जीवे मारण्याची दिली धमकी
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी, खानका मदरसा परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी छेडछाड, मारहाण आणि लुटमार केल्याची गंभीर घटना ७ जून रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित फातेमा हसन अली (वय २१), मजुरी करून उदरनिर्वाह करणारी महिला असून, तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, रजा टॉवर येथील राने गल्लीत एका किरकोळ वादानंतर ती घरी परतली होती. सायंकाळी ७.१५ च्या सुमारास तिच्या घरी तिघेजण – शोलु (पूर्ण नाव माहित नाही), आसिफ बेग उर्फ बाबा काल्या आणि सादिक इबाबत हे आले. तिघांनी शिवीगाळ करत पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. शोलु याने तिचे केस ओढले, तर बाबा काल्या याने गालावर मारहाण केली. सादिक इबाबत याने चाकू दाखवून “तुला ठार मारून टाकू” अशी धमकी दिली.
या गोंधळात पीडितेच्या खिशातील चार ते पाच हजार रुपये काढून नेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना घडत असताना मरियम नाजिर, हिसा नौशिर आणि फातेमा हिसा यांनी पीडितेला मदत केली आणि आरोपींच्या तावडीतून सोडवले.
याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार जितेंद्र पाटील पुढील तपास करत आहेत.