शहरात पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील गायत्री नगर परिसरातील ज्योती संदीप मेकलकर (वय ४५) हे नातेवाइकांकडे असलेल्या लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या असतांना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख नऊ हजार रुपयांसह दागिने, चांदीचे पूजा साहित्य व लॅपटॉप चोरून नेला. ही घटना ३१ मे ते ६ जून दरम्यान गायत्री नगरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, गायत्रीनगरातील ज्योती मेकलकर यांच्या नातेवाइकांकडे लग्न असल्याने त्या लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून रोख नऊ हजार रुपये, सहा हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, नथ, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, चांदीचे नाणे, कुंकवाचे दोन करंडे, १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असे एकूण ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. कुटुंबीय घरी आले त्यावेळी ही घटना लक्षात आली. कपाटामध्ये लक्ष्मी पूजनासाठी वापरण्यात येणारे कोऱ्या नोटांचे सहा बंडलही चोरट्यांनी लांबविले. चोरीमध्ये पूजा साहित्याचा अधिक समावेश आहे.
घरफोडीचा कालावधी पाहिला तर ३१ मे ते ६ जून असा सात दिवसांचा असल्याने नेमकी चोरी कथी झाली याविषयी पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. कालावधी जास्त असल्याने नेमके त्या वेळचे फुटेज काढणेही सुरू आहे. याप्रकरणी ज्योती मेकलकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.