Wednesday, July 16, 2025
Homeजळगावरेल्वे लोखंडी पुलाजवळील रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांतून प्रवास, नागरिक त्रस्त

रेल्वे लोखंडी पुलाजवळील रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांतून प्रवास, नागरिक त्रस्त

रेल्वे लोखंडी पुलाजवळील रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांतून प्रवास, नागरिक त्रस्त

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील मुख्य व अतिवर्दळीचा समजला जाणारा रेल्वे लोखंडी पुलाजवळील रस्ता, सध्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा केंद्रबिंदू बनला आहे. विशेष म्हणजे, या खड्डयासमोर समोर बाजारपेठ पोलीस स्टेशन आहे, तरीही नगरपालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने आणि नागरिक प्रवास करतात. पुलाच्या समोर असलेल्या भागात शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी जाते. याच मार्गावरून नाहटा कॉलेज व गडकरी नगर परिसरातील जलकुंभ भरण्यासाठी पाण्याचा प्रवाह जातो. काही महिन्यांपूर्वी या भागातील गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती पूर्णपणे विसरली गेली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बुधवारी रात्री शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला खड्ड्यांमुळे किरकोळ दुखापत झाली, अशी माहिती मिळाली आहे. अशा अपघातांचे दररोज दोन ते तीन प्रमाण शहरवासी अनुभवत आहेत.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे त्याचे अस्तित्व ओळखणे कठीण होते, आणि त्यामुळे नागरिक अनपेक्षितरीत्या अपघाताला सामोरे जात आहेत.शहराच्या हृदयस्थानी, पोलिस ठाण्याच्या समोर, अशा प्रकारची रस्त्याची दयनीय अवस्था असणे ही नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर शंका निर्माण करणारी बाब आहे.सदर रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुज्ञ नागरिक, व्यापारी वर्ग व स्थानिक सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. अन्यथा प्रशासनाच्या या दुर्लक्षाविरोधात आंदोलनात्मक पावले उचलण्यात येतील, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या