गुरुतत्त्व चांगल्या विचारांना जोडते – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
गुरु एक विचार असून गुरूंसोबत जोडलं जाणे म्हणजे चांगल्या विचारांशी जोडलं जाणं तसेच गुरु असा एक रस्ता आहे जो ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असून फुले जसे तोडणारालाही सुगंध देतात त्याप्रमाणे गुरुतत्त्व निंदा, स्तुती करणाऱ्या सर्वांना समानतेने योग्य दिशा दाखवत असतात. स्वतः कष्ट करून इतरांचे दुःख कमी करायला शिकवणारे गुरुतत्त्व आहे असे अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष व सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात सांगितले.

देशभरातील विविध राज्यातून आलेल्या हजारो शिष्यांशी बोलताना आपल्यातल्या क्षमता ओळखून कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या गुरूविषयी मनात कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे हे सांगताना याच तत्वाने चालणाऱ्या आपले गुरु म्हणजे ब्रह्मलीन जगन्नाथजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देताना ते भावुक झाले. गुरूंना मान देतांना गुरूंचे विचार आत्मसात केले पाहिजेत आणि चारित्र्य निर्माण करण्याचा संकल्प करून त्याच्या पूर्ततेसाठी अखंड प्रयत्न केले पाहिजे. पुढे बोलताना महाराजांनी शाकाहाराचा आग्रह करताना त्यातून शुद्ध सात्त्विक विचार निर्माण होत असल्याचेही ठासून सांगितले.
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक ७ ते ९ जुलै आगम चरित्र या ग्रंथाचे पारायण सतपंथ मंदिर फैजपूर येथे करण्यात आले होते. १० जुलै रोजी सकाळी गुरुपौर्णिमेनिमित्त कळस महापूजा, पादुका पूजन आणि दीक्षादान विधीचे आयोजन केले गेले. पूजेनंतर सत्संग सोहळा निष्कलंक धाम वढोदा येथे संपन्न झाला. प्रारंभी श्री मनोज भाई व सौ. भूमिबेन पटेल यांच्या हस्ते महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांचे पाद्यपूजन झाले. पंडित श्रीकांत रत्नपारखी यांनी वैदिक मंत्रोच्चारण केले. वेद अध्ययनार्थी श्री एकदंत महाराज यांचे पूजन किशोर मोरे व भालचंद्र सोनवणे यांनी केले. प्रतिनिधिक स्वरूपात भक्त परिवारातून श्री जयेश भाई पटेल, कु. शिवानी मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत गुरूंबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त केला तर वढोदा येथील सेवेकरी अनिता सपकाळे यांनी सुंदरशा गुरुभजनाचे सादरीकरण केले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित
कार्यक्रमात एकदंत महाराजांनी आपले विचार मांडताना गुरु ही ज्ञानाची मूर्ती असून शिष्याचे गुरूंशी असलेले नाते ज्ञानासाठी असावे. त्या ज्ञानातून अहंकार, राग, द्वेष गुरुचरणी सोडता येईल फक्त या ज्ञानासाठी श्रद्धा व भाव असणे अत्यावश्यक असून सोबत समर्पण वृत्ती असावी. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनी सत्कर्माचा संकल्प करावा. श्रद्धा ठेवून त्यासाठी प्रयत्न करावे मग प्रकृती सुद्धा तुम्हाला साथ देईन असा मौलिक संदेशही त्यांनी दिला. कार्यक्रमात सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निळकंठ जगन्नाथ गोशाळेसाठी दक्षिण गुजरात सतपंथ समाज मंडळांने मदत निधी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तर रंजनकाकी यांच्यातर्फे तुलसी हेल्थ केअर मध्ये सेवा देणाऱ्या महिला मंडळातील सदस्यांचा व्यक्तिगत सन्मान करत त्यांच्या सेवेलाही अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

