एका विवाहित महिलेचा पैशांसाठी मारहाण करत छळ ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरातील टेलिफोन नगर येथील माहेर असलेल्या एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी पैशांसाठी शिवीगाळ आणि मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ३१ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह सासू आणि दोन नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, प्रीती रोशन जैन (वय ३८, रा. टेलिफोन नगर, जळगाव) यांचा विवाह २००७ मध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रोशन केवलचंद जैन यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाला होता. सुरुवातीची काही वर्षे संसार सुखाचा सुरू होता मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी प्रीतीकडे माहेरून पैसे आणण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. प्रीतीने पैसे आणण्यास नकार दिल्याने या रागातून तिचा छळ सुरू झाला. पती रोशन केवलचंद जैन, सासू वंदनाबाई केवलचंद जैन, आणि नातेवाईक अनिता प्रकाश बाफना व सुनीता सुनील चोपडा (सर्व रा. साक्री, जि. धुळे) यांनी प्रीतीला शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, पतीने तिला मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून प्रीती आपल्या माहेरी जळगावला परत आली.जळगावला परतल्यानंतर, प्रीतीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दिली.
दरम्यान,तिच्या तक्रारीनुसार पती रोशन केवलचंद जैन, सासू वंदनाबाई केवलचंद जैन, अनिता प्रकाश बाफना आणि सुनीता सुनील चोपडा या चार जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करत आहेत.