पाल जंगल सफारी मध्ये बारा फूट लांब अजगराला सोडले– सर्पमित्रांचे कौतुक

रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पुनमचंद जाधव पाल ता. रावेर
रावेर तालुक्यातील विटवा शिवारात ८ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या शेतात तब्बल बारा फूट लांबीचा भलामोठा अजगर आढळून आला. अचानक दिसलेल्या या विशाल सापामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले. शरद वानखेडे यांच्या शेतात हा अजगर वेटोळे घालून बसलेला दिसताच ग्रामस्थांनी तातडीने सर्पमित्रांना कळविण्यात आले .
माहिती मिळताच सर्पमित्र कल्पेश साळुंखे व किशोर सोनवणे हे घटनास्थळी धाव घेऊन पोहोचले. त्यांनी अजगराला कोणतीही इजा न पोहोचविता शिताफीने पकडून वन विभागाच्या ताब्यात सोपवले.
या कारवाईत यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील, रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राजू बोंडल, वनमजूर काशीनाथ बेलदार, रतन पावरा तसेच सफारी गाईड यांच्या मदतीने अजगराला सातपुडा जंगल सफारी क्षेत्रातील सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सातपुडा परिसर हा रावेर तालुक्यातील अनेक दुर्मिळ व संकटग्रस्त वन्यजीवांचा अधिवास आहे. येथे अजगर प्रजातीचे सापही वारंवार दिसून येतात. वन्यजीव संरक्षणासाठी स्थानिक सर्पमित्र व वन विभाग यांच्यातील तात्काळ समन्वयामुळेच या अजगराचे प्राण वाचविणे शक्य झाले. नागरिकांना आवाहन करण्यात येते कि साप दिसल्यास घाबरून न जाता सर्प मित्र यांच्या शी संपर्क साधावा . कारण सर्प हा मानवाचा शत्रु नाही त्याला वाचविणे हे आपले कर्तव्य आहे .

