मातृभूमी मंडळाने साकारली रामेश्वरम येथील सुप्रसिद्ध स्वामीनाथन मंदिराची प्रतिकृती
शंकर-पार्वती, विष्णू, ब्रह्मदेव आणि ब्रह्मांड निर्मितीचे भाविकांना होणार दर्शन
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दरवर्षी मंडळाच्या मंडपात फक्त गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत असली तरी यंदा विशेषतः प्रवेशद्वारापासून मूर्तीपर्यंत भगवान विष्णूंचा दरबार सभागृह साकारण्यात आला आहे. यात शंकर-पार्वती, विष्णू, ब्रह्मदेव आणि ब्रह्मांड निर्मितीचे दर्शन घडवण्याचा अनोखा प्रयत्न मंडळातर्फे केला जात आहे. शहरातील जय मातृभूमी गणेश मंडळ म्हणजेच खानदेशचा राजा यंदा आपल्या स्थापनेची पंचवीस वर्षे पूर्ण करीत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने भाविकांसाठी भव्य आणि आकर्षक स्वरूपातील गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा मंडळाकडून रामेश्वरम येथील सुप्रसिद्ध स्वामीनाथन मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारण्यात आली असून, तब्बल 95 फूट उंचीचे प्रवेशद्वार हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
कोलकत्ता येथील 25 कुशल कारागीर गेल्या महिन्याभरापासून या प्रवेशद्वाराची निर्मिती करीत आहेत. मंडपाचे एकूण परिमाण 125 बाय 62 फूट असून, त्यामध्ये तब्बल 25 फूट उंच गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे 200 पदाधिकारी हे सर्वजण प्रामुख्याने नोकरदार वर्गातील आहेत. राज्यातील विविध भागांत नोकरी करणारे पदाधिकारी गणेशोत्सव काळात मात्र आवर्जून भुसावळला येतात. विशेष म्हणजे, प्रत्येक पदाधिकारी दर महिन्याला आपल्या ऐपतीप्रमाणे मंडळाच्या बँक खात्यात वर्गणी रूपाने दान देतो. या परंपरेमुळे मंडळाला मुबलक निधी उपलब्ध होतो आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळते. खानदेशचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमच्या गणेशाला चांदीचे मोदक, चांदीची फुले व चांदीचा कंबरपट्टा अर्पण केला जातो. मंडळ वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही राबवत असते. यात रावण दहन, श्रीमद् भागवत सप्ताह, संक्रांतीला पतंग मोफत वाटप, गुढीपाडव्याला पहाट उत्सव, दिवाळीत लक्ष्मीपूजन, महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमा उत्सव अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.