Saturday, September 6, 2025
Homeजळगावअंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य

अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य

अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य

१२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

यावल दि.२७   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
“सण-उत्सवांच्या खर्चात बचत करून सामाजिक कार्यात वळवला तर समाजाला खरी दिशा मिळते. अंतर्नाद प्रतिष्ठानने दाखवलेला मार्ग हा लोकमान्य टिळकांच्या विचारांना साजेसा आहे. आज विद्यार्थ्यांना मिळालेली ही मदत भविष्यात त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देईल आणि या उपक्रमाचा वारसा ते पुढे चालवत राहतील,” अशा भावना मान्यवरांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी गणेशोत्सवात राबविण्यात येणाऱ्या ‘एक दुर्वा समर्पण’ या उपक्रमाला यंदा नऊ वर्षे पूर्ण झाली. यावल तालुक्यातील विरोदा व वढोडे जिल्हा परिषद शाळांतील १२० विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी पाटी, पेन्सिल, वह्या, पेन, पट्टी, रंगपेटी, खोडरबर व बालमित्र पुस्तक यांसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गणेशोत्सवात बचत करून दात्यांच्या मदतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ठरला.

या प्रसंगी सरपंच जीवन तायडे, उपसरपंच विनोद झाल्टे, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत बऱ्हाटे, स्वप्नील जावळे, पोलीस पाटील पुरुषोत्तम पाटील, सतीश चौधरी, सुनील चौधरी, अमोल वारके, पंकज बऱ्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी, आभार प्रकल्प समन्वयक कपिल धांडे यांनी मानले. संस्थेचा परिचय प्रकल्प सह-समन्वयक केतन महाजन यांनी तर सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले.

उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रसन्न बोरोले, विक्रांत चौधरी, जीवन महाजन, कुंदन वायकोळे, तेजेंद्र महाजन, उमेश फिरके, विपीन वारके, योगेश साळुंखे यांच्यासह अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

दरवर्षी पाच शाळांची निवड करून राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करत असून समाजात दानशूरता आणि जबाबदारीची भावना रुजवतो. ‘एक दुर्वा समर्पण’ म्हणजे फक्त साहित्यवाटप नसून, समाजाला एकत्र आणणारी आणि उपक्रमशीलतेला दिशा देणारी सामाजिक चळवळ आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या