वरणगाव येथे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सिध्देश्वर नगर रस्त्याची बिकट अवस्था
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी (ता. भुसावळ) | दि. २९ऑगस्ट :
वरणगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ते सिद्धेश्वर नगर दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेलेला असून, या मार्गाने प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत धरून चालणं बनलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम आहे, मात्र ना नगरपरिषद प्रशासनाकडून, ना स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे कुठलीही गंभीर दखल घेतलेली दिसत आहे.
या रस्त्यावरील खड्डे काही ठिकाणी २५ ते ३० फूट लांबीचे असून, पावसात त्यात पाणी साचल्यामुळे छोटे-मोठे अपघात सर्रास घडत आहेत. यामध्ये शेतकरी,विद्यार्थ्यांपासून ते कामावर जाणाऱ्या नागरिकांपर्यंत सगळेच हैराण झाले आहेत.नागरिकांच्या अनेक लेखी व तोंडी तक्रारी असूनही प्रशासन मात्र ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरले आहे.
स्थानीय लोकप्रतिनिधी वेळोवेळी विकासकामांचे गोडगोड आश्वासने देतात,मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे सिद्धेश्वर नगर परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी असून, लवकरात लवकर रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.एकीकडे नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे शहरातील नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत, हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे.
“रोजच्या प्रवासात होणारा त्रास, खड्ड्यांमधून वाहन चालवताना होणारा अपघाताचा धोका आणि प्रशासनाचा असंवेदनशील दृष्टिकोन यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे,”अशी प्रतिक्रिया परिसरातील एका नागरिकाने दिली.
आता प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होतात की आणखी वेळकाढूपणा करतात,हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.मात्र येणाऱ्या पालिका निवडणुकीत याच प्रश्नांवरून नागरिक आपला निर्णय देतील,हे निश्चित.