विक्रीसाठी आणलेला ९ किलो गांजा पोलिसांनी केला जप्त ; दोघांना अटक!
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – न्हावी शिवारातील एका शेतात विक्रीसाठी आणलेला सुमारे २ लाख किमतीचा ९ किलो गांजा पोलिसांनी छाप्यात जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, अटक करण्यात आलेल्यांमध्ये रगन सुकराम बारेला (वय ३२, रा. शिरवेल, मध्य प्रदेश; सध्या मुक्काम न्हावी) आणि अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी (वय २७, रा. सिद्धपूर, ऐलहंका, कर्नाटक) यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व फैजपूर पोलिसांना न्हावी येथील किशोर भागवत पाटील यांच्या शेतात गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी गुरुवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला. छाप्यात रगन बारेला याच्याकडून ५ किलो गांजा (किंमत १,००,२००) अझरुद्दीन याच्याकडून ४ किलो गांजा (किंमत ९४,१४०) असा एकूण ९ किलो गांजा जप्त करण्यात आला. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी भेट दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे व त्यांचे सहकारी करत आहेत.