वरणगावात मच्छरांचा प्रचंड प्रादुर्भाव; नागरिक त्रस्त, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता.भुसावळ दि २
वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मच्छरांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून हिवताप, डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईडसारखे आजार डोके वर काढत असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण त्रस्त आहेत.
शहराचा झपाट्याने होणारा विस्तार,नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतींतील अस्वच्छतेमुळे आणि शहरातील गटारींची वेळेवर सफाई न झाल्यामुळे डासांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांचा उद्रेक होत आहे.सिद्धेश्वर नगर, साईनगर,जालदर नगर,रेणुकानगर,शिवाजी नगर,झोपड पट्टी,अक्सानगर,आणि विकास कॉलनी या भागांमध्ये समस्या अधिक तीव्र असून, फवारणी अथवा धुराळा यासारख्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. साचलेले सांडपाणी, तुंबलेल्या गटारी, रिकाम्या प्लॉट्सवरील गवत, आणि उभ्या गाड्यांच्या आजूबाजूला होणारी डासांची पैदास यामुळे नागरिक वैतागले आहेत.त्यामुळे सामान्य जनतेला उपचारांचा आर्थिक भार सहन करावा लागत असून, रुग्णालयीन खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
शहरात तापाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.विशेषतः लहान मुलांमध्ये तापाची लक्षणे अधिक आढळून येत आहेत.त्यामुळे नागरिकांनी तातडीने धुराळा आणि फवारणीसह साफसफाईची कामे सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.
तथापि,या गंभीर समस्येबाबत नगरपालिका प्रशासन अजूनही मौन बाळगून आहे. कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न आल्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात असताना प्रशासन कधी जागे होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.