ऑपरेशन “नार्कोस” अंतर्गत भुसावळ येथे तीन आरोपींना ४२ किलो गांजासह अटक
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ रेल्वे मंडळात रेल्वे सुरक्षा दलाला अमली पदार्थांच्या अवैध धंद्याविरुद्ध मोठे यश मिळाले आहे. दिनांक २ सप्टेबर रोजी सीआयबी भुसावळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गाडी क्रमांक 12994 अप गांधीधाम एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ सुरक्षा आयुक्त यांच्या समन्वयाने डॉग स्क्वॉड (श्वान वीरू) मागवून आरपीएफ, जीआरपी व डॉग स्क्वॉड यांची संयुक्त पथक गठित करून भुसावळ स्थानकावर सखोल तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान सुरुवातीस काहीही संशयास्पद न आढळल्याने पथकाने गाडीला जळगावपर्यंत तपासले. तपासादरम्यान कोच S-5 मध्ये 03 संशयित व्यक्तींना त्यांच्या बॅगसह पकडण्यात आले. चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने बॅग उघडून पाहिल्या असता खाकी टेपमध्ये पॅक केलेले 21 पाकिटे आढळून आले.
तिन्ही आरोपींना जळगाव स्थानकावर उतरविण्यात आले. आरपीएफ जळगाव कर्मचार्यांच्या उपस्थितीत बॅगचे वजन केले असता एकूण 42.280 किलोग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹8,45,600/-) तसेच 03 मोबाईल फोन (अंदाजे किंमत ₹35,000/-) जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नलूमालु जसवंत डोरा, वय 25 वर्षे, रा. भोलाभांजा, जिल्हा गंजम, ओडिशा ,विप्र प्रकाश विद्याधर सेठी, वय 19 वर्षे, रा. गोपालपूर, ता. कोंडाला, जिल्हा गंजम, ओडिशा ,अलक सुभाषचंद्र बारीक, वय 25 वर्षे, रा. धनंजयपूर, ता. कोंडाला, जिल्हा गंजम, ओडिशा. असे आहे
सदर जप्तीची कारवाई पंच व राजपत्रित अधिकारी सहायक सुरक्षा आयुक्त यांच्या उपस्थितीत जीआरपी सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी केली. त्यानंतर जीआरपी भुसावळ यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास जीआरपी पोलिस निरीक्षक करीत आहेत.
ही कारवाई रेल्वे सुरक्षा दल व जीआरपी यांच्या सतर्कतेचे तसेच समन्वयित प्रयत्नांचे फलित आहे. समाजविघातक अमली पदार्थ तस्करीविरुद्ध रेल्वे प्रशासनाची ही मोठी मोहीम असून पुढेही अशाच दृढनिश्चयाने ही लढाई सुरू राहील.