अंतर्नादकडून “एक दुर्वा समर्पणा ”तून १० विद्यार्थ्यांना सायकल वाटप
गणेशोत्सवात १८७ विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात
भुसावळ | खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक दुर्वा समर्पण” हा उपक्रम राबविण्यात आला. या वर्षी उपक्रमाचे नववे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून तसेच दात्यांच्या स्वेच्छा मदतीतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
पाच दिवस चाललेल्या या उपक्रमाअंतर्गत १८७ विद्यार्थ्यांना वह्या, पेन, अक्षरमित्र पुस्तके, पाट्या, पेन्सिली, पट्ट्या, खोडरबर, रंगपेट्या, रजिस्टर आदी साहित्य वाटण्यात आले. समारोपाच्या दिवशी विशेष उपक्रम म्हणून १० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक मदतीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर
या उपक्रमाची सुरुवात यावल तालुक्यातील विरोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. त्यानंतर वढोदा (ता. यावल) व फेकरी (ता. भुसावळ) येथील शाळांमध्येही शैक्षणिक साहित्य वाटप झाले.भुसावळ येथे सायकल वाटप सोहळ्यात प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील, समन्वयक कपिल धांडे, सहसमन्वयक केतन महाजन, ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, कुंदन वायकोळे, जीवन महाजन, समाधान जाधव, विक्रांत चौधरी, विपीन वारके, दीपक वारके, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
दीपस्तंभ फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य
दीपस्तंभ फाऊंडेशन, मनोबल जळगाव येथे वापराअभावी पडून असलेल्या नवीन सायकली अंतर्नाद प्रतिष्ठानने मागणी करून विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून घेतल्या. त्यांची योग्य दुरुस्ती करून यावल व भुसावळ तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यासाठी संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, संचालक राजेंद्र पाटील, सीएसआर प्रमुख योगेश सूर्यवंशी, ॲडमिन सम्राट माळवदकर, एचआर प्रमुख ईशल नाईक, हॉस्टेल प्रमुख विद्या भालेराव, योगिता महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.
दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी
उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रवीण बऱ्हाटे, अभिषेक चौधरी, देवानंद पाटील, तेजस पाटील, सुनील तायडे, सचिन पाचपांडे, प्रवीण पाटील, राजू बोंडे, मनमोहन करसाळे, भरत बऱ्हाटे, किशोर पाटील, भूषण कोटेचा, अलका सुरवाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
भविष्यात व्यापक स्वरूप
“या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करता आल्या, याचा आनंद आहे. आगामी काळात या उपक्रमाला आणखी व्यापक स्वरूप देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे,” असे अंतर्नाद प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक कपिल धांडे यांनी सांगितले.