नंबर एक दोन तीन तटस्थ.
अवैध सट्टा-मटका व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी
फैजपूर खान्देश लाईव्ह प्रतिनिधी – तालुक्यात अवैध धंद्यामुळे समाज व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे आणि हप्ते खोरीमुळे अवैध सट्टा मटका व इतर अवैध धंदे बंद करण्याची मागणी पत्रकारांनी लेखी स्वरुपात केली. या सामाजिक हितामध्ये मात्र स्वतःला एक दोन तीन नंबर म्हणून घेणारे तटस्थ असल्याने प्रसिद्धी माध्यमांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
फैजपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध सट्टा-मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध धंद्यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे.कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत,युवकांना या जाळ्यात ओढले जात आहे तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी, प्रोत्साहन मिळत आहे.या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी फैजपूर शहरातील पत्रकारांनी एकत्र येत फैजपूर पोलिस स्टेशन मध्ये लेखी तक्रार केली.समाज हिताचे कार्य करणाऱ्या पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,शहरातील काही भागांमध्ये सट्टा-मटका उघडपणे सुरू असून पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कारवाई कशाप्रकारे, आणि कशामुळे थातूरमातूर केली जाते हे सर्वांना ज्ञात आहे.अवैध धंद्यामुळे गरीब व मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे.कष्टाने मिळवलेल्या पैशांची उधळपट्टी या व्यवसायात होत असून संपूर्ण समाजव्यवस्थेवर त्याचा दुष्परिणाम होत आहे. हे समाज विरोधकृत्य पोलिसांच्या गोपनीय विभागाला कळत नाही हे समाजाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
पत्रकारांनी पुढे असेही नमूद केले की,सट्टा-मटका हा केवळ एक जुगार नसून त्यातून व्यसनाधीनता, घरगुती वाद,कुटुंबे उद्ध्वस्त होणे, चोरी सारखे गुन्हे वाढणे अशा अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.त्यामुळे यावर पोलिस प्रशासनाने आणि सुज्ञ लोकप्रतिनिधींनी तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करणे आवश्यक झाले आहे.


या निवेदनावर समीर तडवी, फारुक शेख,सलीम पिंजारी,इदू पिंजारी,मयूर मेढे,प्रा.उमाकांत पाटील,प्रा.राजेंद्र तायडे,राजू तडवी, शाकीर मलक,युनुस पिंजारी यांसह शहरातील अनेक पत्रकारांच्या सह्या आहेत. ( निवेदनावर स्वतःला एक दोन तीन नंबर म्हणून घेणाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने तसेच छायाचित्रात दिसून येत नसल्याने तालुक्यातील भुसावळ परिसरातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ) पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,जर तातडीने कारवाई करून अवैध सट्टा-मटका व्यवसाय कायमचा बंद केला नाही तर पत्रकार संघटना लोकांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबतील.पत्रकारांच्या या ठाम भूमिकेमुळे फैजपूर पोलिस प्रशासनावर कारवाईचे दडपण आले असून, शहरात सुरू असलेल्या या अवैध धंद्याविरोधात काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांसह समाजाचे लक्ष लागले आहे.फैजपूर पोलिस स्टेशनला हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना देण्यात आले. पत्रकारांचे म्हणणे आहे की, जर पोलिस प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर पत्रकार संघटना उपोषणासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारतील. नागरिकांच्या हितासाठी आवश्यक तेवढे टोकाचे पाऊल उचलण्यास ते मागे हटणार नाहीत. या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलिस प्रशासनाने कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

