जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; कासमवाडी परिसरात मध्यरात्री थरार
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वैमनस्यातून एका २७ वर्षीय तरुणावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (३ ऑक्टोबर) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या हत्याकांडामुळे कासमवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील (वय २७, रा. कासमवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
या घटनेबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना पाटील यांचा त्यांच्या घरासमोर वास्तव्य करणाऱ्या काही तरुणांसोबत जुना वाद होता. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील हे कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ परिसरात उभे असताना, त्यांच्या घरासमोरील याच दोन व्यक्तींनी जुने वैमनस्य उकरून काढले.
कोणताही विचार न करता, या दोन हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर यांच्यावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर यांच्या पोटावर तसेच पायाच्या मांडीवर गंभीर वार केले. या हल्ल्यात नाना उर्फ ज्ञानेश्वर हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ खाजगी वाहनातून ज्ञानेश्वर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
या घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मध्यरात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती, मात्र पोलिसांनी हल्लेखोरांचा तातडीने शोध सुरू केला असून, परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या हत्याकांडामुळे जळगाव शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून चिंता व्यक्त होत आहे.

