Monday, February 16, 2026
Homeगुन्हाजुन्या वादातून रेल्वे रुळावर प्रौढाची दगडाने ठेचून हत्या; संशयित ताब्यात

जुन्या वादातून रेल्वे रुळावर प्रौढाची दगडाने ठेचून हत्या; संशयित ताब्यात

जुन्या वादातून रेल्वे रुळावर प्रौढाची दगडाने ठेचून हत्या; संशयित ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगर रेल्वे पुलाजवळ एका ५० वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमर वसंत सपकाळे (वय ५०, रा. खंडेराव नगर) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत अमर सपकाळे आणि संशयित आरोपी यांच्यात कोणत्यातरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी १४ फेब्रुवारीच्या रात्री ८ ते १५ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अमर सपकाळे यांना जळगाव ते भुसावळ दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर गाठले. तेथे त्यांच्यात पुन्हा हाणामारी झाली आणि संतापलेल्या आरोपींनी सपकाळे यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या केली.

सकाळी उघडकीस आला प्रकार
रविवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास खंडेराव नगर रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला.

पोलिसांची तत्पर कारवाई
मयत अमर सपकाळे यांचा मुलगा गिरीश सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन संशयित आरोपींना दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रामानंद नगर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशिवरे करत आहेत. किरकोळ वादातून एका व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या