रावेर डेपोने दिवाळी निमित्त रावेर ते पुणे जादा निमआराम बस सोडण्याची प्रवाशांची मागणी
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी दिवाळीचा सण जवळ येत असताना गावाकडे परतण्याच्या ओढ असते मात्र वाहतुकीच्या सोयीचा अभाव जाणवत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) रावेर डेपोने दिवाळी निमित्त रावेर ते पुणे या मार्गावर जादा निमआराम बस सोडण्याची मागणी स्थानिक प्रवाशांकडून होत आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या वाढत्या भाड्यामुळे आणि रेल्वे तिकिटांच्या टिकून नसलेल्या उपलब्धतेमुळे ही मागणी अधिक तीव्र झाली आहे.
रावेर तालुका जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख केळी पिकविणारा तालुका आहे . रावेर सह सावदा फैजपूर येथील अनेक नागरिक पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थायिक झाले आहेत. दिवाळीच्या काळात गावाकडे परतण्यासाठी सुमारे ५०० हून अधिक प्रवासी या मार्गावर अवलंबून असतात. मात्र, सध्या रावेर डेपोकडून या मार्गावर केवळ दोनच नियमित निमआराम बस धावत असून, त्यांच्यावरही जागा मिळणे कठीण झाले आहे. प्रवाशांच्या मते, गेल्या वर्षीही अशा तक्रारी होत्या . सध्या ऑनलाईन तिकीटही बुक झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे . काही प्रवाशी खासगी (लक्झरी ) बसेसवर अवलंबून असतात .एन दिवाळीच्या सणात खाजगी बसेसचे भाडे दुप्पट-तिप्पट झाले आहे .
“रावेर ते पुणे हा मार्ग ५०० किलोमीटरचा आहे आणि दिवाळीला कुटुंबासोबत परतण्यासाठी गावाकडे परतण्याची ओढ असते .सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स २,००० ते ३,००० रुपये आकारत आहेत.रावेर डेपोने किमान 2 -3 जादा बस सोडाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे .

दिवाळीचा हा सण आनंद आणि एकत्रिततेने साजरा होण्यासाठी रावेर डेपो ने अतिरिक्त दोन-तीन ज्यादा निम आराम बसेस रात्रीच्या वेळी सोडाव्यात प्रवाशांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद द्यावा, ही अपेक्षा आहे. अन्यथा, यंदाच्या दिवाळीतही प्रवाशांना आर्थिक आणि प्रवासातील त्रास सहन करावा लागेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .

