Tuesday, February 17, 2026
Homeगुन्हापित्याच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेप; भुसावळ सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पित्याच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेप; भुसावळ सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पित्याच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेप; भुसावळ सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – रावेर तालुक्यातील पाल शिवारात उडीद दाळीच्या भाजीवरून निर्माण झालेल्या किरकोळ वादातून मुलाने पित्याचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.विशेष बाब म्हणजे,भुसावळ जिल्हा सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून दिलेली ही पहिलीच जन्मठेपेची शिक्षा आहे.
ही घटना २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाल शिवारातील गट क्रमांक २७१ मध्ये घडली होती.आरोपी दिनेश याने वडील अनाज्या बारेला यांना किरकोळ कारणावरून लाकडी खाटेच्या माठ्याने मारून ठार केले होते. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि ३२३ (प्राणघातक हल्ला) अंतर्गत दोष सिद्ध झाल्यानंतर सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा निर्णय दिला.या प्रकरणात एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादी बनाबाई नरसिंग बारेला यांच्या साक्षीला महत्त्व प्राप्त झाले.त्यांनी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या खाटेच्या माठ्याला ओळख दिली,जो न्यायालयीन प्रक्रियेत निर्णायक पुरावा ठरला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी बाजू प्रभावीपणे मांडली.तपास अधिकारी पो.कॉ.कांतीलाल कोळी,ज्ञानेश्वर चौधरी, इमराजा झटके आणि अन्नपूर्णासिंग यांनी तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
खटल्यात दिलेल्या माहितीनुसार,दिनेश हा बेरोजगार होता आणि त्याने काही वर्षांपूर्वी पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले होते. घटना घडताना त्याने वडिलांना उडीद दाळीची भाजी दिल्यामुळे रागाच्या भरात शिवीगाळ व मारहाण केली.त्यानंतर त्यांना तुरीच्या शेतात लाकडी काठ्याने डोक्यावर मारून ठार केले.
या प्रकरणामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत समाजात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे.एखाद्या किरकोळ कारणावरूनही रागाच्या भरात घातलेली कृती किती गंभीर स्वरूप धारण करू शकते, याचे हे उदाहरण आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कायद्याचा धाक अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या