घातपाताचा संशय ! रेल्वे रुळावर आढळला तरुणाचा मृतदेह
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बायपास नजीक असलेल्या रेल्वे रुळाजवळ हर्षल प्रदीप भावसार (३१, रा. दिनकर नगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला तर त्याची दुचाकी का.ऊ. कोल्हे शाळेनजीक आढळली. या प्रकरणी मयताच्या कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप करीत तरुणाला मारून रुळाजवळ टाकण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. ही घटना रविवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली रेल्वेमार्गादरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दिनकर नगरमधील रहिवासी हर्षल भावसार हा कंपनीमध्ये कामाला होता. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्याने घरी आईला भाजी आणून दिली व स्वयंपाक करून ठेव असे सांगून तो बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. या दरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे खांबा क्रमांक ४२३नजीक रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. तरुणाच्या खिशात असलेल्या पाकीट व आधारकार्डवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली व संबंधितांना माहिती दिली. त्या वेळी संध्याकाळपासून घरी न परतलेल्या हर्षलची प्रतीक्षा करणाऱ्या आईला मुलाच्या मृत्यूचीच वार्ता समजली. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला. ही घटना घडली त्या वेळी तरुणाचे वडील घरी नव्हते. कावीळच्या उपचारासाठी दोन ते तीन दिवसांपासून ते भेंडा फॅक्टरी येथे गेलेले आहे. त्यात त्यांच्याकडे मोबाईलदेखील नसल्याने कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तरुणाचा मृतदेह बायपासनजीकच्या रेल्वे रुळाजवळ सापडला तर त्याची दुचाकी का.ऊ. कोल्हे शाळेनजीक आढळली.
दरम्यान, हर्षल याच्यासोबत घातपात झाला असून त्याला मारून रुळाजवळ टाकण्यात आल्याचा आरोप त्याचे मामा मयूर भावसार यांनी केला. तरुणाच्या गळ्याजवळ खोल जखम असून डोक्याला मार लागलेला आहे व पाय तुटला आहे. रेल्वेच्या धडकेत यापेक्षा गंभीर दुखापत होते, त्यामुळे तरुणाला तेथे आणून टाकले असावे, असाही संशय व्यक्त केला.

