कोरपावलीत प्राणप्रतिष्टेत खंडेराय अवतरले : जेजुरी इतकेच महत्व – शास्त्री श्री भक्तीस्वरूपदासजी महाराज

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
यावल तालुक्यातील कोरपावली येथे नूतन
श्री खंडेराय मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात परिसरासह संपूर्ण गाव
भक्तीसागरात तल्लीन झाले. जेजुरीचा खंडेराय कोरपवलीत प्रकट झाल्याच्या अत्यानंदात न्हावून निघाले. श्री स्वामीनारायण मंदिर कोरपावली
द्वारा संचालित श्री खंडोबा मंदिर, कोरपवली द्वारा आयोजित ७ दिवसीय श्री मल्हारी महात्म्य कथा
सप्ताह शास्त्री श्री भक्तिस्वरूपदासजीच्या
वाणीमधून भक्तांनी श्रवण केले.
प्रथम दिवशी श्री स्वामीनारायण मंदिरातून
भव्य पोथी यात्रा व सुंदर नामस्मरणानंतर कथारंभ झाला. दुसऱ्या दिवशी श्री खंडेराय, म्हाळसादेवी आणि बाणाई यांच्या मूर्तीची आकर्षक नगरयात्रा वाजतगाजत यज्ञमंडपापर्यंत नेण्यात आली.
तिसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने गावातील
भाविकांनी उपस्थित राहून सुंदर कथेचा
प्रारंभ केला. शास्त्रीजींनी मणी व मल्हार
यांच्या पूर्वावतारांच्या कथा सांगत सर्वाच्या मनात भक्तीभाव चेतविला. कोरपावली परिसरात अशा प्रकारची मल्हारी महात्म्य कथा प्रथमच आयोजन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे
वातावरण निर्माण झाले.

सप्ताहाच्या पंचम दिवशी चंपाषष्ठीच्या पावन दिवशी प्राण प्रतिष्ठा विधी वेदमंत्राच्या उच्चारात संपन्न झाले. सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत पवित्र ब्राह्मणांद्वारे यज्ञ कार्य संपन्न झाले आणि दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत श्री खंडेराय म्हाळसादेवी व बाणाई यांच्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा शुभमुहूर्तावर पार पडली त्यानंतर सद्गुरु शास्त्री धर्मप्रसाददासजी, शास्त्री भक्तीप्रकाशदासजी आणि शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांच्या पावन आशीर्वाचनांनी भाविक धन्य झाले. याच दिवशी सायंकाळी सहा वाजेनंतर जेजुरीच्या मूळ देवस्थानातून आणलेल्या प्रसादी भूत भंडाऱ्याची उधळण देखील करण्यात आली ज्यात परिसरातील भाविकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला व आनंद घेतला दररोज कथा ऐकण्यासाठी आणि दर्शनासाठी कोरपावली व परिसरातील गावातून मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते संपूर्ण आठवडा अध्यात्म भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहाच्या सुंदर अशा वातावरणात धावून निघाला श्री खंडेरायांच्या कृपेने कोरपावली परिसर पवित्र भक्ती भावाने उजळून निघाला. जेजुरी एवढेच पुण्यफळ या ठिकाणी श्रद्धावानांना मिळेल असे शास्त्री भक्ती स्वरूपदासजी यांनी सांगितले.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन शास्त्री स्वयंप्रकाशदासजी, सूत्रसंचालनाची धुरा शास्त्री भक्तीप्रियदासजी व शास्त्री श्रीजीप्रियदासजी शास्त्री यांनी सांभाळली.
या कार्यक्रमाला अमेरिकेवरून देवेंद्र नथू नेहते व त्यांचा संपूर्ण परिवार न्यूजर्सी विशेष उपस्थिती होती.

