नगरपरिषदेकडून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी तफावत : ‘एनमुक्टो’तर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
नुकत्याच 2/12/2024 रोजी झालेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई यांच्या मानधनात इतर नगरपालिकांच्या तुलनेत एक हजार रुपये एवढी तफावत असल्याची बाब उघड झाली असून, एनमुक्टो प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय सहसचिव डॉ. विजय सोनजे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावे अविनाश गांगोडे, मुख्याधिकारी,फैजपूर यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, राज्याच्या विविध ठिकाणी तसेच अगदी जवळ असलेले यावल नगरपालिका येथे निवडणूक कर्तव्यासाठी केंद्राध्यक्ष 3000, मतदान अधिकारी 2600 व शिपाई 1700 रुपये असे मानधन दिले आहे. मात्र फैजपूर प्रत्येकी 1000 रुपये कमी मानधन देण्यात आले आहे. येथे देण्यात आलेले मानधन अपेक्षेपेक्षा कमी असून असून एकाच जिल्ह्यातील आणि तेही एकाच तालुक्यातील एकाच प्रकारच्या कामासाठी मानधनात एवढी मोठी तफावत का असा प्रश्न उपस्थित होत असून कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एनमुक्टो तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात उर्वरित रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनावर डॉ.विजय सोनजे, डॉ.ताराचंद सावसाकडे, डॉ.रवी केसूर, डॉ. मच्छिंद्र पाटील डॉ.सतीश पाटील, डॉ.जगदीश खरात, डॉ.योगेश तायडे, डॉ.अचल भोगे यांच्यासह इतर सदस्यांच्या सह्या आहेत. निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी श्री.अविनाश गांगोडे यांनी सांगितले की, संबंधित विषयावर निवडणूक अधिकारी व कार्यालयीन स्तरावर तातडीने चर्चा करून या संदर्भात आठ दिवसांच्या आत सकारात्मक व योग्य तो निर्णय घेतला जाईल व कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे.

