भक्तीपूर्ण वातावरणात गजाननाचा जयघोष करीत फैजपूरहून पायीवारी निघाली शेगावीला…

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
गेल्या आठ वर्षापासून येथील जय गजानन गृप तर्फे शरीर संवर्धन तसेच मानसिक शांतीसाठी दर वर्षी फैजपूर ते शेगाव पायीवारी आयोजन केले जाते. यावर्षी दि.१८ डिसेंबर २०२५ गुरुवार ते २१ डिसेंबर २०२५ रविवार असे चार दिवसाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ह्या वारीचे ध्वजपूजन १८ डिसेंबर रोजी महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, सतपंथ मंदिर संस्थान यांचे शुभ हस्ते व तर पालखी पूजन सेवक श्री कडू मुखी यांनी केले. फैजपूर ते शेगाव दरम्यान ११८ किलोमीटर अंतर भाविक ४ दिवसात पार करीत मुक्ताईनगर, मलकापूर, आंबोडा (नांदुरा) मुक्काम करून शेगाव येथे टाळ मृदूंग च्या गजरात दररोज शिस्तीने चालत जात शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतात. या वारीसाठी महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेश येथील सुमारे २२५ भाविक सहभागी झाले आहेत.
या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे चित्र रथाद्वारे अन्न हे पूर्णब्रह्म, जल पुनर्भरण, पशु पक्षी प्रेम, वृक्ष संवर्धन पर्यावरण संबंधित महाराजांनी केलेल्या लीलांचे तसेच स्वातंत्र्य लढ्यात महाराजांचे योगदान, योगाद्वारे देश सशक्तीकरण, भारतीय शिक्षणाचे महत्त्व, सर्वधर्म समभावतेची शिकवण राष्ट्रप्रेम,गजानन महाराजांनी केलेल्या लीला तसेच देहांताच्या नंतरही महाराजांचे येणारे अनुभव या महाचित्ररथा द्वारे समाजाच्या मनावर बिंबविण्यात येतात. या वारीला काहूरखेडे व आंबोडा येथील भजनी मंडळीचे भजन सर्वाना मंत्रमुग्ध करते. अश्व, अब्दागिरी, छत्र, चामर, चवऱ्या, पताका, कलश, तुळशीवृंदावन आदींसह पालखींचे उत्साहात प्रस्थान झाले. पालखी काढायला श्री विलास चौधरी भुसावळ, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत उपस्थित होते.
दिपक होले सर, दिनकर नारखेडे, योगीराज नारखेडे, गिरीश नेमाडे यांनी या वारीचे आयोजन करून धुरा सांभाळली आहे.

