वाळूचे डंपर पकडल्यानंतर कारवाई न करता सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अटक!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कारवाई न करता तो सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महसूल विभागाच्या दोन कर्मचा-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले (वय ३९) व ममुराबादचे तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४) आणि अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून ४ फेब्रुवारी रोजी ममुराबादचे तलाठी सदानंद मुंडे यांनी त्यांचा वाळूचा डंपर पकडला होता. मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोनवरून सांगितल्यामुळे तो डंपर सोडून देण्यात आला होता. ही कारवाई टाळल्याच्या बदल्यात या दोघांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात ११ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने केलेल्या पडताळणीत ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार जुन्या जळगाव परिसरातील अभिजित येवले यांच्या खासगी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ३० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी सदानंद मुंडे यांना पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

