नुपूर महोत्सवात शास्त्रीय नृत्याची अविस्मरणीय मेजवानी; रसिक मंत्रमुग्ध
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नुपूर महोत्सव’ या शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले. नुपूर कथक डान्स अकॅडमी, भुसावळ यांच्या विद्यमाने आयोजित हा महोत्सव डॉ. बी. व्ही. खाचणे हॉल, नंदनवन कॉलनी येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे संचालक सुभाष पाटील, शांती विद्यामंदिर फैजपूरच्या अध्यक्षा सौ. शुभांगी महाजन, आंध्र प्रदेश येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय नृत्यकार श्री. रामा कौंडिण्य, अकॅडमीचे संचालक रमाकांत भालेराव व नृत्य शिक्षिका सौ. चारू भालेराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
प्रास्ताविकात रमाकांत भालेराव यांनी अकॅडमीचे विविध उपक्रम व महोत्सवाची माहिती देताना शास्त्रीय नृत्याला योग्य मान्यता मिळावी व त्याचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांची मेजवानी

या महोत्सवात आतापर्यंत कथक, भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, ओडिसी, मणिपुरी, कथकली अशा विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांचे सादरीकरण झाले आहे. यावर्षी आंध्र प्रदेशचे रामा कौंडिण्य यांनी कुचीपुडी नृत्य सादर करून विशेष दाद मिळवली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘नांदी पंचतुंड नररुंड मालघर’ या गीतावर गायत्री चौधरी, पुनम पाटील, पूजा अग्रवाल, साक्षी कल्याणकर व चेतश्री चौधरी यांच्या प्रभावी सादरीकरणाने झाली.
शुद्ध कथक प्रकारात मत्त तालावर उर्वशी कोळी, डिंपल गाढे व हिमांशू जावळे यांनी आपले कौशल्य दाखवले. त्यांना तबल्यावर शिरीष जोशी, संवादिनीवर स्मिता कुलकर्णी यांची साथ लाभली, तर पढत चारू भालेराव यांनी केली.
‘डिमिक डिमिक डमरू बाजे’ या गीतावर विरा सोनवणे, हितांशी बेंडाळे, इशिता झासकर, काव्या तळले, हेतल फेगडे, वंशिका पाटील, जीविका पाटील व इशिका जोशी यांनी नृत्य सादर केले. गणेश वंदनेत अदित्री दत्ता, स्वरा हेडा, दक्षता पालीवाल, अक्षिता सिंग, सानवी चौधरी, कृतिका शर्मा व सानवी कुंभलकर यांनी सहभाग घेतला.
जुगलबंदीतील तराना नुपूर भालेराव, मोक्षदा तळले, अश्वती सपकाळ, जेसिका अब्राहम, मानसी पवार व जान्हवी खाडवे यांनी सादर केला. ‘वाजत मृदंग अंग तरंग’ या गीतावर रेणुका सपकाळे, कृतिका झांबरे, रुचिता चौधरी व विकल्पा ठाकरे यांनी शिवस्तुती सादर केली.
कुमारी नुपूर भालेराव हिने कथक सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. ‘शिव सुवर्णमालस्तुती’ या गीतावर जान्हवी खाडवे, चेतश्री चौधरी, गायत्री चौधरी, पुनम महाजन, गायत्री बाजारे व साक्षी कल्याणकर यांनी नृत्य सादर केले.
कथक सरगम व तराना प्रकारात प्राप्ती वाघ, अंबज्ञ जोशी, मीनाक्षी झांबरे, बुद्धिश्का सपकाळे व प्रयूषा फालक यांनी सादरीकरण केले. फ्युजन तराना प्रकारात नुपूर भालेराव, उर्वशी कोळी व डिंपल गाढे यांनी आपली चमक दाखवली.

कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘नर्मदाष्टक’ सादर केले. यात नर्मदेची भूमिका मानसी भवते यांनी साकारली.
‘नृत्य श्री’ पुरस्काराने गौरव
यावेळी विशारद परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनी व सर्व सहभागी कलाकारांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर शास्त्रीय नृत्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या कलावंतांना दिला जाणारा ‘नृत्य श्री’ पुरस्कार यंदा आंध्र प्रदेशचे रामा कौंडिण्य यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रितिक सोनार, शुभम बोलके, प्रांजल कुलकर्णी, गिरीश पाटील, प्रकाश फेगडे, भावेश फेगडे आदींनी परिश्रम घेतले. झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. शास्त्रीय नृत्याची अविस्मरणीय मेजवानी अनुभवत रसिक मंत्रमुग्ध झाले होते .

