भुसावळकरांसाठी आनंदाची बातमी! नगरपालिकेचे नाट्यगृह लवकरच साकार होणार?
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. पुणे–मुंबईप्रमाणे सुसज्ज नाट्यगृह असावे, अशी भुसावळकरांची जुनी मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
सध्या शहरात रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे कृष्णचंद्र नाट्यगृह कार्यरत आहे; मात्र नगरपालिकेच्या मालकीचे स्वतंत्र, आधुनिक नाट्यगृह नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत होते. आता छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सच्या वर नगरपालिकेचे नवे नाट्यगृह उभारण्याची योजना अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
या संदर्भात एका महत्त्वाच्या नगरसेवकानेही होकारार्थी संदेश दिल्याने या प्रकल्पाला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे भुसावळकर तसेच नाट्यप्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी मानली जात आहे.
भुसावळमध्ये सध्या मोजकीच थिएटर्स सुरू असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, संगीत मैफिली आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र व आधुनिक सभागृहाची गरज होती. प्रस्तावित नाट्यगृह उभारल्यास शहरातील कला व संस्कृतीला मोठी चालना मिळणार असून मनोरंजनासाठी आणखी एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.
आता नगरपालिकेकडून अधिकृत घोषणा आणि कामाच्या प्रारंभाची तारीख कधी जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.