निंभोरा येथे रविवारी ह.भ.प. प्रा. अश्विनीताई टाव्हरे यांचा भव्य कीर्तन महोत्सव

>> संयुक्त जयंती आणि अजितदादा पवार स्मृतीनिमित्त आयोज I निंभोरा,ता. रावेर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि समाज प्रबोधनकार राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एकदिवशीय भव्य ‘वारकरी विचार जागर कीर्तन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांना या कीर्तन कार्यक्रमातून शब्दसुमनांजली देण्यात येणार आहे. निंभोरा गाव सेवा समितीचे प्रमुख संयोजक व माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या रविवारी ( २२ फेब्रुवारी रोजी) सायंकाळी ७ वाजता येथील आठवडे बाजार चौकात हा कार्यक्रम होईल.
पंचक्रोशीत पहिल्यांदाच उच्चविद्याविभुषित महिला कीर्तनकार
कीर्तनातून छत्रपती शिवराय यांचे बहुजन हिताचे उत्तुंग कार्य, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री आणि रोकडा धर्म सांगणाऱ्या शिकवणी ; यातून समाज प्रबोधन व्हावे व आजच्या युवा पिढीला एक सुदृढ विचार देता यावा, या उद्देशाने निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी पंचक्रोशीत पहिल्यांदाच पुण्यभूमी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील महिला समाज प्रबोधनकार व कीर्तनकार यांच्या कीर्तनसेवेचे भव्य आयोजन केले आहे. निंभोरा व परिसरातील ग्रामस्थांना वारकरी व वैष्णव पंथात कीर्तनकार-व्याख्यात्या म्हणून ख्यातनाम असलेल्या द्वि-पदव्यूत्तर, सेट परीक्षा उत्तीर्ण आणि पीएचडीसाठी पात्र अशा उच्च विद्याविभुषित ह.भ.प .प्रा.अश्विनीताई टाव्हरे यांच्या अमोघ वाणीच्या कीर्तन श्रवणाचा लाभ होणार आहे. उपस्थितीचे आवाहन निंभोरा श्रीराम मंदिर संस्थांनाचे अध्यक्ष अनिल बऱ्हाटे आणि विश्व वारकरी सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रांताध्यक्ष ह.भ.प. संतोष महाजन वाघोडकर यांच्यासह निंभोरा ग्रामस्थांनी केले आहे.

