पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचे १० ते १६ मार्च दरम्यान आयोजन !
दररोज तीन लाख भाविक येणार ; प्रशासनाकडून जय्यत तयारी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ पाडळसे शिवार (ता. यावल) येथे १० ते १६ मार्च या कालावधीत पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार असून दररोज सुमारे तीन लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांसाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. शुक्रवारी भुसावळ प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी रेल्वे, पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तापी नदी सध्या काठोकाठ भरलेली असल्याने नदीकाठावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. पाण्यात दोन बोटी तैनात असतील. अकलूद शिवारात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानव्यवस्था करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी १० घंटागाड्या व २५ ट्रॅक्टरची सोय करण्यात आली आहे.९ मार्च रोजी सकाळी तापी नदीच्या उत्तर भागापासून कथास्थळापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल. दुपारी ४ वाजता पंडित मिश्रा यांचे भुसावळात आगमन होईल. १० ते १५ मार्च दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा निरुपण होणार असून १६ मार्च रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत समारोप होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता ते सिहोरकडे प्रस्थान करतील.
कथास्थळी ३०० बाय ६०० फूट आकाराचा भव्य जर्मन हँगर डोम उभारण्यात येत असून ४० बाय ८० फूट मुख्य व्यासपीठ उभारले जाणार आहे. संगीतकार व माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. भाविकांच्या सोयीसाठी १५ बाय १५ आकाराचे सुमारे २ हजार सिलिंग लावण्यात येणार आहेत.
दररोज लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने सर्व विभागांनी सतर्क राहून भाविकांना सुरक्षित, सुकर व शिस्तबद्ध अनुभव देण्यासाठी नियोजन केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

