वाळू माफियांच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे आक्रमक ; २६ वेळा पत्र दिलं, पण कारवाई नाही !
मुंबई वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील अवैध वाळू उपसा आणि वाळू माफियांच्या मुजोरीचा मुद्दा आता राज्य विधिमंडळात चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी या प्रश्नावरून सरकारला थेट आव्हान दिले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात बोलताना संताप व्यक्त केला की, त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत त्यांनी गेल्या दीड वर्षात तब्बल २६ वेळा लेखी पत्रे दिली आहेत. महसूल मंत्री, महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.वाळू माफियांच्या विरोधात कारवाई का होत नाही, याचे मुख्य कारण ‘हप्तेखोरी’ असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना माफियांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते मिळत असल्यामुळेच कारवाई थंडावली असल्याचा खळबळजनक आरोप खडसे यांनी केला.वाळू माफियांच्या दहशतीमुळे तहसीलदार आणि प्रांताधिकारी कारवाई करायला घाबरतात. अनेकदा अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर आणि घरावर हल्ले होतात, पण त्यांना योग्य पोलीस संरक्षण मिळत नाही, असेही एकनाथराव खडसे म्हणाले.
खडसे यांनी माजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे अधोरेखित केले. आजचे जिल्हाधिकारी माफियांच्या दबावाखाली असून ‘येस सर’ म्हणण्यापलीकडे काहीच करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
“तुमच्यात ताकद असेल तर वाळू आणि मुरूम माफियांना बंद करून दाखवा,” असे थेट आव्हान खडसे यांनी राज्य सरकारला दिले आहे.इतक्या वेळा पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने हे सरकार ‘संवेदनशून्य’ आणि ‘निगरगट्ट’ असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून महसुलाची मोठी चोरी होत असल्याचा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला.
या प्रकरणावर आता सरकार काय भूमिका घेते आणि संबंधित जिल्हा प्रशासनावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

