पोलीसांचा मोठा बंदोबस्त ! घराच्या गेटची तोडफोड, एक गंभीर जखमी!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत किरकोळ दगडफेक होऊन घराच्या गेटचीही तोडफोड करण्यात आली. या राड्यामध्ये दोन जण जखमी झाले असून, भाजप नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात बुधवारी दोन गट जुन्या वादावरून आमनेसामने आले. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवले.या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटाच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक (RCP) तैनात केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुन्या वादातून झाला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. परिसरात पोलिसांचा कडक पहारा असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी परिसरातील महिलांनी देखील भीती व्यक्त केली असून सुरक्षिततेची मागणी केली आहे.

