Thursday, March 5, 2026
Homeगुन्हाविवाह सोहळ्यातून दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

विवाह सोहळ्यातून दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

विवाह सोहळ्यातून दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
भुसावळ खानदेश लाईव्ह प्रतिनिधी – भुसावळ येथील एका विवाह सोहळ्यातून नववधूचे दागिने असलेली पर्स लांबवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
६ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये फिर्यादी उज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता. या वेळी नववधूचे दागिने एका पर्समध्ये ठेवण्यात आले होते. लग्नविधी सुरू असताना दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान सोफ्यावर ठेवलेली ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडीया सांसी येथील असल्याचे निष्पन्न झाले.

 

Oplus_131072

यानंतर पोलिसांचे एक पथक १९ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मध्यप्रदेशात तळ ठोकून तपास करत होते. तपासादरम्यान आरोपी कृषी निरज बेडीया याने चोरीचे काही दागिने त्याचे नातेवाईक नरोत्तम सिसोदिया यांच्याकडे ठेवले असल्याची माहिती मिळाली. अखेर उपसरपंच संजय सिसोदिया यांच्या मध्यस्थीने हे दागिने पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर दागिने फिर्यादींनी ओळखले असून पुढील तपासासाठी ते भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शरद बागल, रवी नरवाडे, अंमलदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक प्रमोद यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या