शिवमहापुराण कथेनिमित्त फैजपूर-
भुसावळ मार्गावरील वाहतूकीत बदल : सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाहतूक बंद

फैजपूर । खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अकलूद शिवार, गुरुकृपा पेट्रोल पंपाच्या मागे भुसावळ-फैजपूर मार्गावर दि.१० ते १६ मार्च २०२६ या कालावधीत पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (बी) अन्वये अधिकार वापरून हा आदेश जारी केला आहे. दि. १० मार्च ते १६ मार्च दरम्यान दररोज सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत अकलूद
शिवारातील कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासह सर्व उपमार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग भुसावळ-फैजपूर मार्गावरील हॉटेल रिव्हर पॉईंट ते भोरटेक फाटा दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील, भुसावळहून फैजपूरकडे जाणारी

एस.टी. बस, कार, रिक्षा व दुचाकी वाहतूक अकलूद जुना टोलनाका येथून यावल मार्गे फैजपूरकडे वळविण्यात येईल. फैजपूरहून भुसावळकडे जाणारी वाहतूक यावलमार्गे टी-पॉईंटवरून तापी पुलाद्वारे भुसावळकडे वळविण्यात येईल. रावेर- सावदा – फैजपूर मार्गे भुसावळकडे जाणारी वाहतूक बनाना सिटी सावदा येथून हतनूर- बोहर्डी फाटा मार्गे वळविण्यात येईल, रावेर-सावदा- फैजपूर मार्गे येणारी अवजड मालवाहतूक यावल किनगाव मार्गे जळगाव- भुसावळ कडे वळविण्यात येईल. तर चोपडा-यावल कडून भुसावळकडे जाणारी वाहतूक धानोरा फाटा (अडावद) येथून डांभुर्णी-जळगाव मार्गे वळविण्यात येईल. भुसावळहून तापी पुलावरून फैजपूरकडे येणारी अवजड वाहतूक जळगाव-डांभुर्णी-किनगाव-यावल मार्गे फैजपूरकडे वळविण्यात येईल. या कथेला साधारण सात ते आठ लाख भाविक येणार असल्याचा अंदाज असल्याने प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे.
वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून
सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

