Tuesday, March 10, 2026
Homeजळगावसाताऱ्यात ‘महा-APTICON २०२६’ राज्यस्तरीय परिषदेत फैजपूर येथील फार्मसी शिक्षणातील योगदानाबद्दल डॉ. व्ही....

साताऱ्यात ‘महा-APTICON २०२६’ राज्यस्तरीय परिषदेत फैजपूर येथील फार्मसी शिक्षणातील योगदानाबद्दल डॉ. व्ही. आर. पाटील यांचा गौरव

साताऱ्यात ‘महा-APTICON २०२६’ राज्यस्तरीय परिषदेत फैजपूर येथील फार्मसी शिक्षणातील योगदानाबद्दल डॉ. व्ही. आर. पाटील यांचा गौरव

प्रा. उमाकांत पाटील

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

फार्मसी शिक्षक सक्षमीकरण, नवतंत्रज्ञान व संशोधनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन तथा ‘APTI-MS तर्फे डॉ. व्ही. आर. पाटील यांना ‘बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड’

असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आयोजित “महा-APTICON २०२६” ही राज्यस्तरीय परिषद सातारा येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. राज्यभरातील फार्मसी शिक्षक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत फार्मसी शिक्षणातील बदलते प्रवाह, आधुनिक अध्यापन पद्धती, संशोधन आणि नवतंत्रज्ञान या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

या परिषदेत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला. संशोधन, अध्यापन, प्रशासन आणि सामाजिक योगदान या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फार्मसी शिक्षक व संस्थांचा सन्मान करण्यात आला.

फार्मसी शिक्षकांसाठी, शिक्षकांद्वारे आणि शिक्षकांची अशी संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेली ही परिषद महाराष्ट्रातील फार्मसी शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली. दिवसभर विविध तांत्रिक सत्रे, पॅनल चर्चासत्रे आणि मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. या सत्रांमध्ये तज्ज्ञांनी डिजिटल शिक्षण साधने, संशोधन व पेटंट संस्कृती, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण आणि परिणामकारक मूल्यांकन तंत्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या परिषदेत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. औषधनिर्मिती क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, आरोग्यसेवा क्षेत्रातील नव्या संधी तसेच औषधोपचारातील गुणवत्ता वाढविण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ फार्मसी शिक्षणतज्ज्ञ फैजपूर येथील डॉ. व्ही. आर. पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे, संशोधन संस्कृतीला चालना देणे आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

या निमित्ताने APTI महाराष्ट्र राज्य शाखेने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करत ‘APTI-MS डॉ. व्ही. आर. पाटील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड’ या पुरस्काराची स्थापना करण्याची घोषणा केली. सन २०२६ पासून दरवर्षी अभ्यासक्रम रचना, संशोधन उत्पादकता, शिक्षक-विद्यार्थी विकास आणि सामाजिक योगदान या निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फार्मसी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राचार्य म्हणून कार्य करताना डॉ. पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला नवे परिमाण दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधनाभिमुख वातावरण आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण प्रणाली मजबूत करण्यात आली. त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे फार्माकोग्नॉसी विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच फार्मसी विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते APTI महाराष्ट्र राज्य शाखेचे माजी अध्यक्षही राहिले असून राज्यातील फार्मसी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.

संशोधन क्षेत्रातही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान दिले असून बँकॉक, जपानमधील तुकोशीमा युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलिया येथे आयोजित परिषदांमध्ये सहभाग व संशोधन सादरीकरण करून भारतीय फार्मसी शिक्षणाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार, भारतीय शिक्षण रत्न पुरस्कार, समाजश्री मिलेनियम पुरस्कार, ज्वेल ऑफ इंडिया अवॉर्ड तसेच लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रियाताई महेश शिंदे, क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वारिंदर कंवर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाच्या एज्युकेशन रेग्युलेशन कमिटीचे चेअरमन डॉ. दीपेंद्र सिंग, APTI चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद उमेकर, उपाध्यक्ष डॉ. सोहन चितलांगे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राकेश सोमाणी, यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, तसेच डॉ. विजयसिंह माने, डॉ. बी. पी. रोंगे, सुधीर नाना पवार, डॉ. नामदेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

एकूणच साताऱ्यात संपन्न झालेली “महा-APTICON २०२६” परिषद फार्मसी शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरली असून राज्यातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर नेण्यासाठी ती महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या