शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आमदार अमोलभाऊ जावळे यांनी उपस्थित केला अधिवेशनात
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात रावेर मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी वादळी पाऊस, गारपीट व जमीन खरडून झालेल्या शेती नुकसानीचा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना प्रश्न विचारत बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
मे, जून व जुलै २०२३ दरम्यान झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार केळी, कापूस, ज्वारीसह विविध पिकांचे नुकसान झाले असून अनेक गावांतील शेतकरी व मोठ्या क्षेत्रावरील शेती बाधित झाली आहे.
या नैसर्गिक आपत्तीनंतरही अनेक प्रकरणांमध्ये अंतिम अहवाल सादर न झाल्यामुळे सुमारे ३०९४ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिल्याचे आमदार जावळे यांनी अधिवेशनात मांडले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांचा अंतिम अहवाल तातडीने सादर करून शासनाच्या नियमांनुसार त्यांना आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही आमदार जावळे यांनी यावेळी केली. या प्रश्नामुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

