नाहाटा चौफुलीवर सापळा रचत दोघांना पकडले, अधिकारी फरार
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – सावकारी परवान्यासाठी (लायसन्स) मदत करून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ येथील सहकार विभागातील दोन प्रमाणित लेखापरीक्षकांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली. मात्र, या प्रकरणातील वर्ग-३ चे सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड यांना सापळ्याची कुणकुण लागताच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते (वय ६२, माऊलीनगर, रेणुका माता मंदिराजवळ, राजस्थान मार्बलमागे, भुसावळ) आणि हेमंत प्रकाश काळे (वय ४०, विवेकानंद नगर, जिल्हापेठ, जळगाव) यांचा समावेश आहे. या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी परवाना प्राप्त करायचा होता. यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर संशयितांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सोमवारी (दि. १५) एसीबीने सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे दोन्ही लेखापरीक्षक लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी भुसावळातील नाहाटा चौफुली परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोचले. त्यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. तर सहकार अधिकारी विजय गरूड हे सापळ्याची माहिती मिळाल्यानंतर पसार झाल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, प्रणेश ठाकूर, बाळू मराठे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.