वि.का सोसायटीने पिककर्ज नाकारल्याने साकेगावच्या शेतकऱ्याचे आमरण उपोषण

भुसावळ, खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी
साकेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात शेतकरी अशोक रंगनाथ कुरकुरे यांनी सोमवार (ता. १५) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. नियमित कर्जफेड करूनही चालू हंगामासाठी पिककर्ज नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अशोक कुरकुरे हे गेल्या ३३ वर्षांपासून साकेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद असून दरवर्षी पिककर्ज घेत असल्याचे त्यांनी सांगितले. , मागील वर्षी सोसायटीमधील कथित बोगस बागायत कर्जप्रकरणाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तसेच ज्या शेतजमिनींवर विटभट्ट्या सुरू आहेत, त्या लाभार्थ्यांनाही पिककर्ज देण्यात आल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. याच कारणामुळे चालू वर्षी त्यांना पिककर्ज देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सोसायटीचे सचिव व कर्मचारी “कुठेही तक्रार करा, आम्ही कर्ज देणार नाही,” अशी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी २ जून २०२६ रोजी भुसावळ येथील सहकारी निबंधक कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. तसेच १५ जूनपासून उपोषणास बसण्याचा इशाराही दिला होता. मात्र कोणतीही दखल न घेतल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वेळेवर पिककर्ज न मिळाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे आर्थिक अडचणीमुळे रखडली असून त्यातून होणाऱ्या नुकसानास साकेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था जबाबदार राहील, असा इशाराही कुरकुरे यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे साकेगाव परिसरात चर्चा रंगली असून संबंधित शेतकऱ्याच्या मागण्यांबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

