Tuesday, March 17, 2026
Homeजळगावभुसावळ नगरपालिकेची सभा पुन्हा तहकूब; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

भुसावळ नगरपालिकेची सभा पुन्हा तहकूब; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

भुसावळ नगरपालिकेची सभा पुन्हा तहकूब; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

भुसावळ,  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरून भुसावळ नगरपालिकेची साधारण सभा पुन्हा एकदा गदारोळात तहकूब करण्यात आली. आधीच वादग्रस्त ठरलेली ही सभा आज (मंगळवार) पुन्हा घेण्यात आली होती; मात्र सत्ताधारी आणि विरोधकांतील तीव्र वादामुळे अखेर सभा २३ मार्चपर्यंत पुढे ढकलावी लागली.
सभेला सुरुवात होताच वातावरण तापले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्ताधारी नगरसेविकांनी त्याला विरोध दर्शवल्याने आधी महिलांमध्ये, त्यानंतर पुरुष नगरसेवकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. काही क्षणांतच हा वाद उग्र रूप धारण करत दोन्ही गट समोरासमोर आले आणि सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी सभागृह सोडले. त्यानंतर सत्ताधारी गटातील सदस्यही बाहेर पडले आणि सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, संभाव्य गोंधळ लक्षात घेता पोलिस प्रशासनाने नगरपालिकेच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप देण्यात आले होते.
याचवेळी आणखी एक वाद निर्माण झाला. अधिकृत माध्यम प्रतिनिधींना सभागृहात बसण्यास मनाई करण्यात आल्याने पत्रकारांनी संताप व्यक्त करत सभागृहाचा बहिष्कार टाकला. या प्रकारामुळे प्रशासनावर पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहराच्या विकासाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना पुन्हा एकदा सभा तहकूब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरात अनेक वर्ष प्रशासक काळ राहीलया नंतर आता निवडून आलेले नगरसेवक जोमाने विकास करतील असा विश्वास आता डगमगत असून लाखो लोकांच्या संबंधित असलेल्या विकास प्रस्ताव पुन्हा लांबणी वर जात आहे . २३ मार्च रोजी होणारी पुढील सभा आता निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या