जिल्ह्यात गॅस टंचाईवर नियंत्रणासाठी ८३ ठिकाणी धाडी ; प्रशासनाची विशेष कारवाई !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभर एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याची झळ जिल्ह्यातही जाणवत आहे. गॅस टंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले असून, गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके नियुक्त केली आहेत.
धाडीची माहिती जिल्हा प्रशासनाने गॅस वितरणातील गैरप्रकार थांबवण्यासाठी १५ पथकांची नियुक्ती केली होती. गेल्या दोन दिवसांत या पथकांनी जिल्ह्यातील ८३ ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली. या कारवाईदरम्यान पाचोरा येथे एका व्यावसायिकाकडे नियमबाह्य दोन सिलिंडर आढळल्याने त्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. ग्राहकांची अडचण सिंगल सिलिंडर असलेल्या ग्राहकांना केवायसीसह विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागल्यामुळे लहान व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कुटुंबे गॅसचा काटकसरपूर्वक वापर करत असल्याचेही नोंदवले गेले.सुधारित प्राधान्यक्रम जाहीर राज्य शासनाने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वितरणासाठी सुधारित प्राधान्यक्रम जाहीर केला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि. १४ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारने शिल्लक व्यावसायिक सिलिंडर वितरणाचे अधिकार राज्य शासनाला दिल्यानंतर यासंबंधी कारवाई अधिक सुसंगत झाली आहे.
ग्रामीण भागातील समस्या
ग्रामीण भागात गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, वेटिंगचा कालावधी वाढल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. काही कुटुंबांनी पर्यायी इंधन वापर सुरू केले असून, सिलिंडर घरी आल्यानंतर रोख रक्कम द्यावी लागल्यामुळे काही ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

