पाडळसे शिवमहापुराण कथेच्या आयोजकांकडून वीटभट्टीवरील मजुरांना उद्धटपणाची वागणूक..?

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी , दि. १७ – शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाडळसा -अकलूद शिवारात नुकताच लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘शिवमहापुराण’ कथेच्या प्रसिद्धी, प्रभावाच्यामागे अत्यंत गंभीर आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे.
पाडळसे ( ता. यावल ) येथील विजय भाई,छोटू भाई,रतन धोंडू भाई व अजय रतन भाई यांनी सिहोर येथील प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे भव्य आयोजन केले यात त्याचा
सामाजिक,राजकीय प्रभाव दिसून आला असला तरी आयोजकांच्या मालकीच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीट भट्टी वरील मजूर कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातून रोजगारासाठी आणलेल्या सुमारे २० ते २५ मजूर कुटुंबांना गेल्या महिन्याभरापासून मजुरी देण्यात आलेली नाही.त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून ही कुटुंबे अक्षरशः उपाशी असल्याचे समोर आले आहे.यात लहान मुले आणि महिलांसह सर्वजण अन्नावाचून, पिण्याच्या पाण्यापासून त्रस्त असून,काही महिला गर्भवती असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
मजुरांचा आक्रोश — ११२ वर कॉल करून मागितली मदत
वेळेवर मजुरी न मिळाल्याने आणि मालकांकडून कोणतीही दाद मिळत नसल्याने अखेर मजुरांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला.त्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मजुरांची परिस्थिती जाणून घेतली असता,“गेल्या काही दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत,मजुरी मिळत नाही,” अशी व्यथा मजुरांनी मांडली.“कथेचा झगमगाट, पण मजुरांच्या चुली विझल्या”

एका बाजूला लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था,दानधर्म आणि धार्मिक कार्यक्रमांचा मोठा गाजावाजा सुरू असताना, दुसरीकडे त्याच आयोजकांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या घरात चार दिवसांपासून चुली पेटलेल्या नाहीत. “महादेवाची कथा ऐकवणारे आमचेच मालक आम्हाला अन्नावाचून मारत आहेत,”अशी व्यथा मजुरांनी व्यक्त केली.
दमदाटी,शिवीगाळचा दावा; महिलांवरही अन्याय
कामगारांनी थकीत मजुरीची मागणी केल्यावर वीटभट्टी मालकांकडून टाळाटाळ केली जात असून उलट दमदाटी व शिवीगाळ केल्याचे आरोप महिला मजुरांनी केले आहेत.या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
३ लाख रुपयांची मजुरी थकीत; मुकडदमचा दावा मजुरांचा मुकरदम (सुपरवायझर) रशीद खान यांनी सांगितले की,एकूण सुमारे ३ लाख रुपये मजुरी थकीत असून,ती देण्यास मालक टाळाटाळ करत आहेत.तसेच, पोलिसांत तक्रार करू नये यासाठी सायंकाळपर्यंत २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रशासनाची निष्क्रियता; कारवाईची मागणी या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मजुरांना मजुरी न देणे, त्यांना उपासमारीला ठेवणे व दबाव टाकणे हे ‘वेठबिगारी’ कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे ठरू शकतात.त्यामुळे श्रम विभाग, पोलीस प्रशासन,राज्य महिला आयोग आणि मानवाधिकार आयोग यांनी तात्काळ हस्तक्षेप करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
धार्मिक कार्यक्रमांच्या आडून मजुरांचे शोषण होत असल्याचा हा प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित वीटभट्टी मालकांवर कठोर कारवाई करून मजुरांना तातडीने थकीत मजुरी मिळवून द्यावी,अशी मागणी आता संपूर्ण भुसावल विभागातून होत आहे.

