चोरट्यांचा धुमाकूळ! टेलर दुकानासमोरून १५ मिनिटांत दुचाकी लंपास
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – चाळीसगाव शहरातील बस स्टॅन्ड मागील परिसरात टेलर दुकानासमोर उभी केलेली दुचाकी अवघ्या १५ मिनिटांत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गोकुळ मधुकर राठोड (रा. वलठाण, हमु. नारायणवाडी, ता. चाळीसगाव) हे टेलर व्यवसाय करीत असून, त्यांचे बस स्टॅन्ड मागे राठोड टेलर नावाचे दुकान आहे. २३ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजता त्यांनी एमएच १९ डीई १८५८ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल दुकानासमोर उभी केली होती.दरम्यान, ते आपल्या शालकासह नारायणवाडी येथे औषधे घेण्यासाठी गेले होते. सुमारे १५ मिनिटांनंतर परत आल्यावर दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकीचा काहीच मागमूस लागला नाही.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

