नवीन एसटी बस उद्घाटन कार्यक्रमाच्या चुकीच्या नियोजनामुळे राजकारण तापले ;
यावल आगार प्रमुखांवर निलंबनाची टांगती तलवार ?
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२३
नवीन एसटी बसच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनावरून यावल शहरासह रावेर-यावल आणि चोपडा-यावल विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर काही लोकप्रतिनिधींची छायाचित्रे असताना,एस.टी. महामंडळाच्या संदर्भातील महत्त्वाच्या नेत्यांचे तसेच चोपडा-यावल संयुक्त विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्र नसल्याने आणि यावल नगरपरिषद उभाठा गटाच्या लोकनियुक्त अध्यक्षा यांना प्रोटोकॉल प्रमाणे वागणूक न मिळाल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन करताना यावल आगार प्रमुखांकडून गंभीर चूक झाल्याची चर्चा सुरू आहे. एसटी महामंडळाच्या नवीन बसेसच्या उद्घाटनासारख्या महत्त्वपूर्ण शासकीय कार्यक्रमात सर्व संबंधित लोकप्रतिनिधींना समान स्थान देणे अपेक्षित असताना, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्र वगळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे,जिल्हास्तरापासून दिल्लीपर्यंतच्या विविध लोकप्रतिनिधींची छायाचित्रे बॅनरवर झळकत असताना स्थानिक विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांचे छायाचित्र नसणे हा केवळ तांत्रिक किंवा अनावधानाने झालेला प्रकार आहे की नियोजनातील गंभीर हलगर्जीपणा,असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे यावल शहरातील तसेच रावेर-यावल आणि चोपडा-यावल विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे.सत्ताधारी गटातीलच लोकप्रतिनिधींना कार्यक्रमातून अथवा प्रसिद्धी साहित्यामधून डावलण्याचा प्रकार झाल्याने आगार प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जाण्याची शक्यता असून,यावल आगार प्रमुखांच्या चुकीच्या नियोजनाची चौकशी होण्याची चर्चा आहे.दोष निश्चित झाल्यास संबंधित आगार प्रमुखांवर निलंबनासह प्रशासकीय कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान हा प्रकार नेमका कोणाच्या सूचनेनुसार घडला, बॅनर तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची नावे व छायाचित्रे का तपासण्यात आली नाहीत आणि कार्यक्रमाच्या नियोजनातील जबाबदारी नेमकी कोणाची,याबाबत आता चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यावल आगाराच्या एका बॅनरमुळे निर्माण झालेला हा वाद आता केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता,प्रशासकीय नियोजनातील त्रुटी आणि स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे.वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतात.? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

