पत्रकाराला उघड धमकी; कार्यक्रमस्थळी तणाव, पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्युज : शहरातील पत्रकाराला भर कार्यक्रमात उघडपणे धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली असून यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NCR) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार मुराद इब्राहिम पटेल (वय 48, रा. हिरापुर रोड, सबस्टेशनजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजता जुना मालेगाव रोड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
कार्यक्रमस्थळी उपस्थित असताना आरोपी किशनराव यशवंत जोर्वेकर (रा. चाळीसगाव), संपादक – दैनिक ‘सर्वांचा ग्रामस्थ’ यांनी फिर्यादीला उद्देशून मोठ्याने धमकी दिल्याचा आरोप आहे.
“तू व्हॉट्सअॅप ग्रुपवर माझ्याविरुद्ध मोहीम चालवली आहे, ती तुला महागात पडेल. मी तुला बघून घेईन, तुला मार खावा लागेल,” अशा शब्दांत धमकी दिल्याचे फिर्यादीत स्पष्ट नमूद आहे.
या घटनेवेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित असल्याने काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, यापूर्वीही संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपवरील लेखांवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोपीने मनात राग धरून फोनवरूनही धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याबाबत लेखी सूचना दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे चाळीसगावात पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, आरोपीवर कडक कारवाईची मागणी पत्रकार वर्तुळातून होत आहे.



