हिरापूर रोडवरील टँकर अपघातात महिलेचा मृत्यू; रस्त्यावरील खड्ड्यांवर संताप


चाळीसगाव : शहरातील हिरापूर रोडवरील दूध सागर रोड परिसरात पेट्रोल-डिझेल टँकरने धडक दिल्याने एका महिलेचा रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात मंगलाबाई राजेंद्र देवकर या गंभीर जखमी झाल्या होत्या.घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. मात्र सुरुवातीला कोणीही जखमी महिलेला मदत करण्यास पुढे येत नसल्याचे दिसून आले. त्यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण, नगरपालिका गटनेते प्रशांत कुमावत, नगरसेवक रामचंद्र जाधव, करण पाटील, विशाल कारडा, धर्मा बच्छे, प्रदीप चावला आदींनी तत्परता दाखवत महिलेला उचलून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या अपघातातील टँकरचा क्रमांक MH 41 BQ 9005 असा असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, हिरापूर रोडवरील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळेच अपघाताला कारणीभूत परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करण्यात येत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. अखेर या दुर्लक्षामुळे एका महिलेचा जीव गेला असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी जोर धरत आहे.

