मिरवणुकीवर दगडफेक व जातीवाचक शिवीगाळ चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवार, दि. १४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मिरवणूक सुरू असताना काही जणांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. याबाबत फिर्यादी व साक्षीदार विचारणा करण्यासाठी गेले असता संबंधित चौघांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.तसेच बुधवारी (दि. १५) सकाळी १० वाजता फिर्यादी व समाजबांधव मुख्य रस्त्यावर जमले असताना पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गोपीनाथ एकनाथ निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १२६(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तसेच मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी भेट दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड करीत आहेत.



