बनावट कागदपत्रे प्रकरणी मंत्री महोदयाच्या पत्नी विरुद्ध तक्रार!
पोलीस अधीक्षक कार्यवाही करणार का.. ?
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – मंत्री महोदयाच्या पत्नीने जात पडताळणी साठी बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी नगराध्यक्षां गायत्री भंगाळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याने पुढील कार्यवाही काय होणार.? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
भुसावळच्या नगराध्यक्ष सौ. गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्यासह काही सहकाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी खोटे आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तक्रारीनुसार आपल्या जात पडताळणी प्रकरणात आपला दावा सिद्ध होऊ नये, यासाठी विरोधकांनी उत्तर प्रदेशातील फत्तेपूर बजेरिया, महोबा येथून काही कागदपत्रे गोळा करून समितीसमोर सादर केली.ही कागदपत्रे खोटी आणि बनावट असल्याचा दावा भंगाळे यांनी केला आहे त्यातून दुसऱ्याच्या मालमत्तेचा आणि व्यक्तींच्या ओळखीचा गैरवापर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.गायत्री भंगाळे यांनी दिलेल्या निवेदनात संबंधित कागदपत्रांमध्ये नमूद असलेले कामता प्रसाद नारायण आणि आपले नातेवाईक असलेले कामता प्रसाद हे वेगवेगळे व्यक्ती असून त्यांची चुकीची सांगड घालून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रतिमा मलिन झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.या प्रकरणात संबंधितांवर भारतीय न्याय संहितेतील फसवणूक आणि संगनमताशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन पुढील चौकशी सुरू करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.