भुसावळ येथे शहराच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधक यांनी समन्वय समिती स्थापन करा – माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची मागणी

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 20
नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी करदाता नागरिक म्हणून पुढे येत दोन्ही बाजूंना संयम आणि विकासाभिमुख भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
नेमाडे यांनी स्पष्ट केले की, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण केला जात असून हा विषय संबंधित शासकीय पडताळणी समितीकडे आहे. समितीचा निर्णय येण्यापूर्वी सार्वजनिक स्तरावर त्यासंदर्भात आरोप करणे योग्य नसून त्यामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे. भुसावळकरांना सध्या नियमित पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, चांगले रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. जनतेचे हाल होत आहेत . शहरातील अनेक भागात 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याची स्थिती असून यासाठी योग्य नियोजन करून निश्चित वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापनाचीही समस्या गंभीर बनली असून कचराकुंड्यांमधील कचरा मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावर पसरत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कामात कुचराई केल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडे असून त्यांनी अशा गैरवर्तन करणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, असा मागणीवजा सल्ला उमेश नेमाडे यांनी दिला आहे.
नेमाडे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी “दोन पावले मागे” घेऊन शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी सुचवले की, आपत्कालीन प्रश्नांसाठी सत्ताधारी–विरोधकांची संयुक्त समिती स्थापन करून तसेच इतर तज्ज्ञ मुत्सद्दी मध्यस्थांचा सहभाग करून आमदार तथा मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून विकासकामांना निधी उपलब्ध करून गती द्यावी. तसेच माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अनुभवाचाही उपयोग करून घ्यावा.
नगरपालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद चर्चा न होता गोंधळ होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. निवेदन स्वीकारणे, त्यावर कारवाई करणे हा नगराध्यक्षांचा अधिकार असून प्रशासनानेही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक असल्यास कायद्याने दिलेले अधिकार वापरण्याचाही सल्ला त्यांनी नगराध्यक्षांना दिला.
भुसावळ हे सर्वधर्मीय आणि सर्वजातीय लोकांचे “मिनी भारत” असल्याचे सांगत, शहरातील सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी झाल्याचा उल्लेख करत त्यांनी राजकीय नेत्यांनीही तसाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे म्हटले. शेवटी, “जनतेला वाद नकोत, तर सुविधा हव्यात. लोकांची पिळवणूक थांबवा आणि विकासाला प्राधान्य द्या,” असे ठाम मत व्यक्त करत, परिस्थिती न सुधारल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, तशी नामुष्की येऊ देऊ नका, असा इशाराही उमेश नेमाडे यांनी दिला आहे.

