Tuesday, April 21, 2026
Homeगुन्हाअल्पवयीन मुलीचे अपहरण; १० तासांत आरोपीसह मुलगी पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीचे अपहरण; १० तासांत आरोपीसह मुलगी पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीचे अपहरण; १० तासांत आरोपीसह मुलगी पोलिसांच्या ताब्यात
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             शहरातील नागद रोड परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या १० तासांत मुलीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास नागद रोड येथील १५ वर्षीय मुलीस प्रेम दिनेश चव्हाण (रा. स्वामी समर्थ कॉलनी, चाळीसगाव) याने आमिष दाखवून तिच्या वडिलांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये दि. १९ एप्रिल रोजी पहाटे १.१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे अपहृत मुलगी ही काळेवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे असल्याचे समजताच पोलिसांचे पथक तात्काळ तेथे रवाना करण्यात आले.स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी प्रेम चव्हाण याला ताब्यात घेऊन अपहृत मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर दोघांना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील करीत आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या