समायोजन बदलीत अन्यायाचा आरोप; शिक्षकाचे बेमुदत उपोषण सुरू

जळगाव | खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या समायोजन बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत एरंडोल तालुक्यातील केवडीपुरा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र हिलाल चित्ते यांनी आजपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चित्ते यांच्या म्हणण्यानुसार, समायोजन बदली प्रक्रियेदरम्यान एका शिक्षकाने जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्षपदाचे तात्पुरते नियुक्तीपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली. या पत्राच्या आधारे संबंधित शिक्षकाचे नाव बदली यादीतून वगळण्यात आले, तर त्यांच्या जागी चित्ते यांना विस्थापित करण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता पाळली गेली नसून कोणतीही सुनावणी न घेता प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून चित्ते यांनी १ एप्रिलपासून गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी सादर केल्या. मात्र, प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही किंवा कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, असा आरोप चित्ते यांनी केला आहे.
शेवटी न्याय मिळवण्यासाठी हतबल होऊन त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला असून, प्रशासनाने तातडीने चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही चित्ते यांनी दिला आहे.

