मनपाच्या ९२ जागांवर नवे होर्डिंग; उत्पन्नवाढीचा नवा मार्ग

पावसाळ्यापूर्वी २४४ होर्डिंग्सचे स्ट्रक्चर ऑडिट; सुरक्षिततेवर भर
जळगाव | खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरातील ९२ ठिकाणी नवीन होर्डिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या माध्यमातून महापालिकेला आर्थिक हातभार लागणार आहे. स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी याबाबत माहिती देत, लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महापालिकेच्या उत्पन्नाचे विविध स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने शहरात सर्वेक्षण केले असून, त्यानुसार ९२ जागांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी होर्डिंग उभारण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या उपक्रमातून मिळणारा महसूल शहरातील विकासकामांसाठी उपयोगात आणला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील होर्डिंग्सच्या सुरक्षिततेवरही भर देण्यात येत आहे. दरवर्षी वादळी वाऱ्यांमुळे जीर्ण झालेले होर्डिंग कोसळून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याने यंदा पावसाळ्यापूर्वीच सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील एकूण २४४ होर्डिंग्सचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार असून, हे काम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनपाच्या नगररचना विभागाकडे सर्व होर्डिंग्सची अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याने तांत्रिक पातळीवर सखोल तपासणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपाययोजनांमुळे एका बाजूला मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार असून, दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या सुरक्षिततेचीही योग्य काळजी घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

